
पुणे:- पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशन येथे महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर व्यवहार आणि जातीवाचक धमक्यांवर आधारित गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हरेश ज्ञानदेव पंचमुख व त्यांची पत्नी रूपाली हरीश पंचमुख यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
हरेश पंचमुख यांच्या मते, त्यांचे राजंणगाव गणपती येथील वडीलोपार्जित महार वतन शेतजमिनीवर प्रवीण मनीलाल संघवी, दिपक प्रवीण संघवी, आणि बिपिन राजमल गुंदेचा यांनी बेकायदेशीर हस्तक्षेप केला आहे. २०१० मध्ये या जमिनीवर चुकीच्या नावे दस्तऐवज नोंदवण्याचा प्रकार उघड झाला असून, त्यानंतर २०२३ मध्ये पुणे येथील बिल्डर करण बोत्रा यांना जमीन विक्री करण्यात आली.
हरेश पंचमुख आणि त्यांच्या पत्नीने टिंबर मार्केट, भवानी पेठ, पुणे येथे जमिनीबाबत चौकशी केली असता, प्रवीण मनीलाल संघवी व बिपिन राजमल गुंदेचा यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यांनी म्हटले की,तुमची लायकी नाही, तुम्ही महार मांग लोक, परत इथे आला तर मारून टाकेन. यामुळे सामाजिक आणि कायदेशीर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
खडक पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी अनुजा देशमाने यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकरण सध्या तपासाधीन असून, भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि कोणत्याही प्रकारच्या जातीवाचक त्रासाशिवाय न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे, असे हरेश पंचमुख यांनी सांगितले.
हे प्रकरण स्थानिक जमिनीच्या हक्कांसंबंधी असून, राजनैतिक आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचे आहे.








