रांजणगाव – मागासवर्गीय महार वतन जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या भूमाफिया संदीप सुदाम कुटे याच्या विरोधात शेतकऱ्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता, पोलीस प्रशासनाने तक्रार स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून स्थानिक पोलीस प्रशासन भूमाफियांना संरक्षण देत असल्याचा आरोप उभा राहिला आहे.
भीमराव सारंग रोकडे, सुभाष सारंग रोकडे आणि सविता वसंत राजगुरू यांनी सांगितले की, त्यांच्या गट क्रमांक १०४० वर भूमाफिया संदीप सुदाम कुटे यांनी तारेचे कंपाउंड टाकून जबरदस्तीने कब्जा केला आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, परंतु तक्रार नाकारली गेली. “पोलीस प्रशासनाने भूमाफियांना बळ देऊन आमच्यावर अन्याय केला आहे, ज्यामुळे आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या घटनांमुळे रांजणगाव परिसरातील शेतकरी मोठ्या त्रासांत आहेत. जर पोलीस प्रशासन भूमाफियांना समर्थन देत राहिले, तर भविष्यात शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी व शेतीवर कब्जा गमवावा लागू शकतो. शेतकऱ्यांनी यासाठी तत्पर कारवाईची मागणी केली आहे.








